६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टी दारुवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप वसंत जाधव (वय ४९, रा. मिरजोळे-बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी सातच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा मिरजोळे-पाटीलवाडी नदीकिनारी जंगलमय भागात झाडीझुडपात विनापरवाना हातभट्टी दारुची निर्मिती करत असताना सापडला. पोलिसांनी साहित्यासह ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हवालदार नितीन डोमणे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









