रत्नागिरी:- मासेमारीचे जाळे घेऊन गावखडी समुद्रकिनारी गेलेले ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण करून बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद गावखडी भंडारवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथील रिक्षाचालक व शेतकरी सुनील कंपू मुडे (वय ३९) यांनी दिली आहे. अपहरित श्रीधर भिवा मुडे (वय ६२, रा. भंडारवाडी, गावखडी, ता. जि. रत्नागिरी) हे फिर्यादी सुनील मुडे यांचे चुलते आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास श्रीधर मुडे हे मासेमारीचे जाळे घेऊन गावखडी समुद्रकिनारी मासेमारीकरिता जातो, असे सांगून घरातून निघून गेले होते. मात्र, उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा कसून शोध घेतला, परंतु ते अद्यापपर्यंत घरी परत आलेले नाहीत. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण करून त्यांना बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याची तक्रार पुतणे सुनील मुडे यांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४/२०२६ नुसार नोंद केली असून, बेपत्ता श्रीधर मुडे आणि अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी पूर्णगड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.









