नऊ महिन्यात जिल्ह्यात 92 तर एकट्या तालुक्यात 52 रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२६ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल ९२ डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ५२ रुग्ण एकट्या रत्नागिरी तालुक्यातील आहेत. शहरातील अर्धवट व चालू असलेली बांधकामे, तेथील साचलेले पाणी आणि भंगार व टायर विक्रेत्यांच्या हलगर्जीपणामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाने नगर पालिकेला पत्र देऊन संबंधित बिल्डर्सना नोटीस बजावण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. रत्नागिरीत अनेक राजकीय लोकप्रतिनिधींना डेंग्यूची लागण झाली आहे.
जिल्ह्यात चालू वर्षी (२०२६) ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण ५५६ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी ९२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषतः ऑगस्ट (१८ रुग्ण), सप्टेंबर (३९ रुग्ण) आणि ऑक्टोबर (२३ रुग्ण) या तीन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच दिवासांमध्ये झालेल्या तपासणीत १५ संशयित सापडले. मात्र त्यापैकी सर्व निगेटिव्ह आले. परंतु तरी देखील डेंग्यूची साथ वाढतच चालली आहे. मागील वर्षाच्या (२०२५ मधील एकूण ४२ रुग्ण) तुलनेत यंदा रुग्णसंख्या दुपटीहून अधिक वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
रत्नागिरी शहरी भागात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तांबटआळी परिसरात येथील सॅक्रेड हार्ट शाळेच्या आवारात ६ डेंग्यू रुग्ण आढळून आले. परिसराची पाहणी केली असता मस्कर दवाखान्याशेजारी एक जुने बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने डासांची मोठी उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिस लाईन परिसरात मोठ्या बांधकामांवर काम करणारे मजूर वारंवार डेंग्यू बाधित आढळत आहेत. मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी असलेली अस्वच्छता आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेट्समध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
वारंवार सूचना देऊनही बांधकाम ठेकेदार या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने, संबंधित बिल्डर्सना तात्काळ नोटीस बजावून तेथे धूर व अळीनाशक फवारणी करावी आणि डास अळीची घनता धोक्याच्या पातळीबाहेर आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी विनंती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीतील अनेक राजकीय लोकप्रतिनिधींना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले आहे.
टायर व भंगार विक्रेत्यांनाही सक्त सूचना
डेंग्यूचा डास स्वच्छ साठलेल्या पाण्यात उत्पत्ती करतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भंगार आणि टायर विक्रेत्यांनाही हिवताप कार्यालयाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उघड्यावर पडलेले टायर्स, प्लास्टिक आणि भंगार साहित्यात पाणी साचू न देणे, आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी कोरडी करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









