उजव्या पायावरून चाक गेल्याने गंभीर दुखापत
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात भरधाव कारने पादचारी महिलेला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ६५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर ते माळनाका जाणाऱ्या मार्गावर घडली. तारामती हरिश्चंद्र साळवी (वय ६५, रा. आंबेडकरवाडी रोड, रत्नागिरी) या महिला जमता बँकेसमोर असलेल्या ‘योजक’ दुकानासमोरून पायी चालत जात होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या एम.एच. १३ सी.के. १५२३ या चारचाकी गाडीचा चालक मकरंद सुरेश शिंदे (वय ४९, रा. रहाटाघरवाडी, मालगंड) याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी अत्यंत हयगयीने आणि बेदरकारपणे चालवली.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीच्या पुढील डाव्या बाजूचे चाक पादचारी तारामती साळवी यांच्या उजव्या पायावरून गेले. या भीषण अपघातात तारामती साळवी या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघाताप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या मपोहेकों ईशिता रूपेश वाडावे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी चालक मकरंद सुरेश शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या अपघातामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









