Saturday, August 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी महाराष्ट्रातून एकही कंपनी बाहेर गेलेली नाही: उद्योगमंत्री ना. सामंत

महाराष्ट्रातून एकही कंपनी बाहेर गेलेली नाही: उद्योगमंत्री ना. सामंत

उद्योग क्षेत्राच्या घोडदौडीत महाराष्ट्र देशात अव्वल

रत्नागिरी:- राज्यात उद्योग क्षेत्राच्या स्थलांतराबाबत आणि कंपन्या बंद पडण्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड भूमिका मांडली आहे. विरोधकांकडून केला जाणारा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि राजकीय स्टंट असून, प्रत्यक्षात कोणतीही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत आकडेवारीचा दाखला देत गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र आजही देशामध्ये अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार कागदोपत्री निष्क्रिय असणाऱ्या आणि चालत नसलेल्या कंपन्या स्वयंचलितरीत्या बंद होत असल्याचे सांगत त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत देशभरात ३६,२११ कंपन्या बंद झाल्या असल्या, तरी २०१५-१६ मधील ६ लाख ७८ हजार ७६८ वरून मोदी सरकारच्या काळात देशातील नोंदणीकृत कंपन्यांचा आकडा वाढून २१ लाख १७ हजार ४४७ वर पोहोचला आहे. यामध्ये महाराष्ट्रात ३ लाख ९६ हजार २११ कंपन्या सक्रिय असून, उद्योग बुडाले नसून केवळ कागदावर न चालणाऱ्या कंपन्या बंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. मागील चार वर्षांत परकीय गुंतवणूक आणि एकूण गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे, हा कोणताही राजकीय सर्वे नसून आरबीआयचा अधिकृत अहवाल असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. चाकणमधील उद्योगांच्या आणि रस्त्यांच्या समस्यांवर बोलताना मंत्री सामंत यांनी एमआयडीसीच्या हद्दीतील रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी देण्यात आला असून आगामी डिसेंबर २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती दिली. तसेच गडचिरोलीसह विविध भागांतील प्रकल्पांची वस्तुस्थिती न समजता केवळ पत्रकार परिषदा घेऊन टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी सुनावले. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी उपक्रमांची घोषणा करताना रत्नागिरीत दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात येईल आणि १५ ऑगस्ट रोजी माजी सैनिकांचा गौरव केला जाईल, असे जाहीर केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेला उत्तर देणे आणि त्यांचे समाधान करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत, इतर राजकीय टिकेकडे दुर्लक्ष करून केवळ राज्याच्या प्रगतीवर आणि विकासावर आपला भर असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी शेवटी स्पष्ट केले.