रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात दुचाकीचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम भिम ओड (वय ३० वर्षे, रा. गोडावून स्टॉप जवळ, कोहीनर सोसायटी, ता. व जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रेम ओड यांचा भाऊ बलदेव भिम ओड यांनी यासंदर्भात खबर दिली आहे. गत १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वाअकराच्या सुमारास रत्नागिरीतील भगवती मंदिर परिसरात प्रेम ओड यांच्या दुचाकीचे अचानक ब्रेक फेल झाले. या अपघातात त्यांच्या पोट आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर त्यांना सुरुवातीला रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर खासगी परकार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या आतड्याला दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथील बालाजी बिर्ला वालावलकर रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार त्यांना वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उपचार सुरू होते. यादरम्यान, २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली व रक्तदाब कमी होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, सावर्डे पोलीस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची (अ.मृ. रजि. नं. ००/२०२६, बी.एन.एस.एस. १९४) नोंद करून कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरीकडे वर्ग करण्यात आली आहेत.









