चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पंचामृत ढाब्यासमोर रविवारी रात्री उशिरा एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेमुळे विचित्र अपघात घडला. या अपघातात एकूण ८ गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, पुण्यातील दोन पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की, ३ मे २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. RJ-19- GH- 8403) चा चालक आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे आणि भरधाव वेगात घेऊन जात होता. यावेळी चालकाने महामार्गावरील विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोर असलेल्या इनोव्हा गाडीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, इनोव्हा गाडी जाऊन फिर्यादी यांच्या बीएमडब्ल्यू कारला धडकली. त्यानंतर साखळी पद्धतीने एकामागे एक अशा एकूण ८ गाड्या एकमेकांना धडकल्या.
या आपघातात बीएमडब्ल्यू-३२०डी (MH-12- NU-9348), इनोव्हा (MH-12- GC-7934), आयशर ट्रक (NH-47- BY-8697), अपघातग्रस्त ट्रक (RJ-19- GH-8403), बोलेरो पिकअप (MH-08- AP-9943), रिक्षा (MH-08- AQ-673), ट्रक (MH-09- CU-3259), ट्रक (MH-08- EA-7008) या गाड्यांचे नुकसान झाले.
या अपघातात फिर्यादी चैतन्य अनिल बेंगळे (वय २७, रा. वडगाव शेरी, पुणे) आणि त्यांचे मामा सेंटैंगो देवासगायम डेव्हीड हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर ट्रकचालक मदतीसाठी न थांबता किंवा पोलिसांना खबर न देता वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी चैतन्य बेंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.









