Tuesday, August 4, 2026
spot_img
Home चिपळूण तिवरे पुलावरून पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

तिवरे पुलावरून पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी पुलावर ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवर्धन किरण संगा (वय २०, रा. कन्ना चौक, जि. सोलापूर, सध्या रा. होंडा शोरूमच्या बाजूला, खेर्डी, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.

३१ जुलै रोजी सायंकाळी ६:३५ वाजण्याच्या सुमारास राजवर्धन संगा हा तिवरे फणसवाडी येथील पुलावर उभा होता. यादरम्यान तो आपल्या गाडीच्या काचा पुसत असताना अचानक पाण्यात खाली पडला आणि सोबत असलेल्या खबर देणार (फिर्यादी) मोहम्मदन नासीर अब्दुल रहिम खान यांना नदीच्या प्रवाहात वाहून जाताना दिसला.

घटना घडल्यानंतर मोहम्मदन खान व अन्य उपस्थितांनी राजवर्धनच्याच गाडीने त्याचा शोध सुरू केला. ते शोधत असताना गंगेचीवाडी, तिवरे (ता. चिपळूण) येथे आले असता, राजवर्धन नदीच्या काठावरील झाडाझुडपांमध्ये अडकलेला दिसून आला. त्यानंतर त्या सर्वांनी मिळून त्याला तात्काळ कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद (अमृ. क्रमांक १८/२०२६, बीएनएसएस १९४ प्रमाणे) चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.