चौकशी अहवालात धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता
रत्नागिरी:- लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलेल्या डॉ. कांचन मदार या अवैधरित्या गर्भपात करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. मदार वैद्यकीय अधिकारी असलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० पासून गर्भपाताच्या (एमटीपी) गोळ्यांचा साठा उपलब्ध नव्हता, असे आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात आढळले आहे. त्यामुळे गर्भपातासाठी डॉ. मदार कुणाकडून गोळ्या उपलब्ध करून देत होत्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात, येत असून अवैध गर्भपाताचा संशय आता व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालातून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (४८, रा. पागमळा, चिपळूण) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ जून रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार महिला गरोदर होत्या आणि त्यांना गर्भपात करावयाचा होता. याकरिता त्यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मदार हिची भेट घेतली.
या भेटीदरम्यान डॉ. मदार हिने तक्रारदार महिलेला गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी ४ ते ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारदारांच्या अर्जानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, डॉ. मदार हिने गर्भपाताच्या किटसाठी ४ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
डॉ. मदार यांच्या अटकेनंतर जिल्ह्यातील आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तसेच यासंदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चौकशीमध्ये डॉ. मदार काम करत असलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० सालापासून गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा साठा उपलब्ध नव्हता. तसेच कामथे रुग्णालयाकडून अशा गोळ्यांची मागणी देखील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे करण्यात आली नव्हती. त्यामुळे मदार यांना गोळ्या पुरवणारा देखील आता चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशानाकडून लाचलुचपत विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार डॉ. मदार यांच्याकडे आढळून आलेल्या गोळ्या कोणत्या आहेत. त्यासंदर्भात माहिती उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली. मदार यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असल्याने त्यांसदर्भात सर्व बाजूनी तपास आरोग्य विभागाकडून करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे..
गर्भपात विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार?
डॉ. कांचन मदार काम करत असलेल्या कामथे रुग्णालयात २०२० सालापासून गोळ्यांचा साठा उपलब्ध नसल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मदार यांच्याकडून गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या असल्यास ही एक गंभीर बाब आहे. या संदर्भात, लाचलुचपत विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून गोळ्यांबाबत माहिती मागवण्यात आली आहे. डॉ. मदार यांच्याकडे आढळलेल्या गोळ्या गर्भपाताच्या असल्यास त्यांच्यावर गर्भपात विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे जिल्हा रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









