रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ‘विशेष मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण’ कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेत चिपळूण उपविभागाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, मतदार यादीचे शंभर टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारे ‘टेरव बुद्रुक’ हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली.
केवळ ७ दिवसांत काम फत्ते!
या विशेष मोहिमेची सविस्तर माहिती देताना उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले की, “३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन गणना अर्ज भरून घेणार आहेत आणि त्यानंतर त्याचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. या प्रक्रियेत बीएलओ यांना येणाऱ्या तांत्रिक आणि इतर अडचणी समजून घेण्यासाठी आम्ही सुरुवातीला एकाच मतदार यादी भागाची (गांव) संपूर्ण प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरवले.
यासाठी चिपळूण विधानसभा मतदार संघातील (२६५) टेरव बु॥ या गावाची निवड करण्यात आली होती. केवळ ७ दिवसांच्या विक्रमी वेळेत या गावातील संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
टेरव बुद्रुक गावातील एकूण १९५ मतदारांपैकी १८७ मतदारांच्या अर्जांचे यशस्वी डिजिटलायझेशन करण्यात आले. उर्वरित ८ मतदारांपैकी ५ मतदार हे नोकरी किंवा व्यवसायानिमित्त इतरत्र स्थलांतरित झाले आहेत, तर ३ मतदार हे कायमस्वरूपी इतर ठिकाणी वास्तव्यास गेले आहेत. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी स्थानिक तलाठी, अंगणवाडी सेविका आणि निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी (क्लर्क) समन्वयाने काम केले. घरोघरी जाऊन डेटा गोळा करणे आणि त्याचे तात्काळ ऑनलाइन डिजिटलायझेशन करणे ही दोन्ही कामे अचूकपणे पार पाडण्यात आली.








