भररस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथे दारूच्या नशेत भररस्त्यात पडलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी नशेत आढळल्याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

​गुरुवारी, २३ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर निवृत्ती नवाळे हे वाल्मिकीनगर ते वेसवी रोडवर पेट्रोलिंग करत होते. यावेळी विरेश भाटकर यांच्या बिअर शॉपीसमोरील रस्त्यावर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली त्यांना दिसली.

​पोलीस अंमलदार नवाळे यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता, गणेश रामचंद्र खेडेकर (वय ४० वर्षे ​पत्ता: मूळ रा. वेळास श्रीवर्धन, जि. रायगड, सध्या रा. बलदेवाडी) दारूच्या प्रचंड नशेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला नीट उभेही राहता येत नव्हते आणि त्याच्या तोंडाचा दारूचा उग्र वास येत होता. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर व्यक्तीने दारूचे सेवन केल्याचे प्रमाणित केले.

​या प्रकरणी पोलीस अंमलदार सागर नवाळे (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.