बुरंबाड-सरंद येथील घटना
संगमेश्वर:- आरवली ते माखजन मार्गावर मोटारसायकल अतिवेगाने चालविताना नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास बुरंबाड-सरंद हद्दीत घडली.
तुषार शंकर प्रथम (वय २२, रा. बुरंबाड, मुळेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील एफ.झेड. मोटारसायकल (एमएच ०८ एटी ५७७९) घेऊन आरवली ते करजुवे आंतरजिल्हा मार्गावरून बुरंबाड ते माखजनच्या दिशेने जात होता. बुरंबाड-सरंद सीमेजवळ आल्यानंतर त्याने मोटारसायकल अतिवेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने वाहन रस्त्यावर घसरून अपघात झाला.
या अपघातात तुषार याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलचेही नुकसान झाले. घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश विलास गायकवाड यांनी फिर्याद दिली असून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.









