खेड भरणे येथील घटना
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे येथील जाधव पेट्रोलपंपाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची दुर्घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चुलत भाऊ राजेश रघुनाथ मोहिते आणि त्यांची पत्नी सुहानी राजेश मोहिते हे दोघे आपल्या मालकीच्या दुचाकीवरून (क्र. एमएच ०८ एडब्ल्यू ७१०८) कळंबणी येथून हेदलीकडे जात होते. भरणे येथील जाधव पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी ते महामार्गावर आले असता, गोवा ते मुंबई दिशेने जाणाऱ्या टोयोटो हायराईडर कारच्या (क्र. जीजे १५ सीक्यू १३००) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, राजेश रघुनाथ मोहिते, सुहानी राजेश मोहिते यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. या दोन्ही जखमींना सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ०१:२८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक पार्थ जितेंद्र रावत याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









