Tuesday, May 12, 2026
spot_img
Home खेड भरणे नाक्यावर उभ्या ट्रॅव्हल्सला कारची पाठीमागून धडक; पाच जण जखमी

भरणे नाक्यावर उभ्या ट्रॅव्हल्सला कारची पाठीमागून धडक; पाच जण जखमी

कार चालकावर गुन्हा

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील भरणेनाका परिसरात प्रवाशांना उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार चालक आणि कारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी, ९ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अधिकराव पर्शुराम पाटील (वय २७, रा. साखराळे, सांगली) हे आपल्या ताब्यातील खासगी ट्रॅव्हल्स (क्र. MP 10 ZG 5054) घेऊन भरणेनाका येथे रस्त्याच्या बाजूला उभे राहून प्रवासी उतरवत होते. त्याच वेळी मुंबईच्या दिशेकडून येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने (क्र. MH 02 BM 4279) उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून प्रचंड वेगात धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग ट्रॅव्हल्सच्या खाली घुसल्याने कारमधील प्रवासी जखमी झाले. यामध्ये परशुराम गुणाजी थेराडे (रा. कुचांबे, ता. संगमेश्वर), प्रतिक्षा परशुराम थेराडे (रा. कुचांबे, ता. संगमेश्वर), शिल्पा परशुराम थेराडे (रा. कुचांबे, ता. संगमेश्वर), अर्जुन धोंडीबा चाळके (रा. सातारा) आणि गजानन गावडे (कार चालक, रा. मालवण) यांचा समावेश आहे.या सर्वांना किरकोळ व गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक अधिकराव पाटील यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी कार चालक गजानन गावडे (रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हायगईने आणि भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.