खेड:- मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे नाका येथे शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. मुंबई-गोवा महामार्गालगत उभ्या असलेल्या खाजगी लक्झरी बसला भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडला असून या दुर्घटनेत स्विफ्ट कारमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सावर्डेच्या दिशेने निघालेली मारुती स्विफ्ट कार भरणे नाका परिसरातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लक्झरी बसला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील प्रवासी गाडीत अडकून पडल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका तसेच स्थानिक नागरिक आणि भाजपचे वैभव खेडेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
खेड पोलिस, स्थानिक नागरिक आणि मदत पथकांनी जवळपास पाऊण तास अथक प्रयत्न करून गाडीत अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या अपघातात परशुराम खराडे, अनुज चाकळे, मनीषा परशुराम स्मारे, प्रतिक्षा खराडे, शिल्पा खराडे व जनार्दन असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्व प्रवासी हे मुंबईहून सावर्डे येथे निघाले असल्याची माहिती समोर येत आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही मिळत आहे.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.









