Sunday, August 9, 2026
spot_img
Home खेड एसटीत विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी वाहक निलंबित

एसटीत विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी वाहक निलंबित

संशयित वाहक पोलिसांच्या ताब्यात

खेड:- तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची बी. डी. गोचडे या एसटी वाहकाने छेडछाड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी एसटी बसमध्ये घडला. पोलिसांनी संशयित वाहकास ताब्यात घेतले असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, याप्रकरणी सायंकाळी उशिराने या वाहकास सेवेतून निलंबित करण्यात आले.

याबाबतचा सविस्तर अहवाल येथील आगारप्रमुखांनी तातडीने वरिष्ठ कार्यालयास पाठवला होता. त्यानुसार विभागीय वाहतूक नियंत्रकांनी ही कारवाई केली आहे. पिडित विद्यार्थिनी खेड आगाराच्या बसमधून प्रवास करीत होती. यावेळी वाहक गोचडे हा विद्यार्थिनीकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती विचारत छेडछाड करत होता. या प्रकारानंतर विद्यार्थिनी आसनावरून उठून बाजूला उभी राहिली. ती बसमधून उतरली असता वाहकाने पाठलाग करत तिचा मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

बसमध्ये घडलेला हा प्रकार पीडित युवतीने महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कानावर घातला. त्यानंतर शिवसेना उपनेते संजय कदम यांनी थेट खेड बस स्थानक गाठले. यादरम्यान, बस स्थानकप्रमुख हजर नव्हते, आगारप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर ते बस स्थानकात दाखल झाले. मात्र, बस स्थानकप्रमुखांनी स्थानकात येण्यास विलंब लावल्याने कदम यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक नियंत्रक कक्षाजवळ एकच गर्दी झाली. सेवा बजावण्यासाठी चिपळूण येथे गेलेल्या संशयित वाहकाला तातडीने खेड बस स्थानकात येण्याच्या सूचना एसटी प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यानुसार वाहक आल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसारं वाहकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.