Saturday, October 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बालिकेवर अत्याचार प्रकरणी शिक्षकास जन्मठेप

बालिकेवर अत्याचार प्रकरणी शिक्षकास जन्मठेप

चिपळूण विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

चिपळूण:- गुहागर तालुक्यातील एका शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम शिक्षक. उदय नामदेव वेल्हाळ याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावली. सदर कामी सरकारी पक्षातर्फे विशेष ज्येष्ठ सरकारी अभियोक्ता पुष्पराज शशिकांत शेट्ये यांनी काम पाहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२० मध्ये पीडित बालिका दुसरीत शिकत होती. त्यावेळी त्या वर्गाला शिकवण्यासाठी आरोपी उदय वेल्हाळ याची शिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ७ मार्च २०२० रोजी पीडित बालिका ही घरी गेल्यावर ती लंगडत चालत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यावेळी तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता त्या बालिकेने आरोपी उदय वेल्हाळ याने तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचा पाढा वाचला. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने गुहागर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्षक उदय वेल्हाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाच्या तपासाअंती आरोपीविरुद्ध भा. दं. वि. कलम ३७६ (क), आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम ३ (ब), ४, ५ (क), (फ), ६, ११ (१), १२ अन्वये दोषारोपपत्र चिपळूण न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच पीडित बालिकेच्या आईचे निधन झाले होते. मात्र सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये आणि गुहागर पोलिसांनी सरकारी पक्षाची बाजू न्यायालयापुढे जोरदार लावून धरली. प्रत्यक्ष सुनावणीच्या कामी सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी युक्तीवाद केला. तसेच आरोपी पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. अखेर न्यायालयाने आरोपी उदय वेल्हाळ याला दोषी ठरवले आणि पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. तसेच गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आश्विनी पाटील यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप भंडारी, ए. एस. शिंदे यांनी काम पाहिले.