देवरुख पोलिसांची धडक कारवाई; संशयितामध्ये तीघे साडवलीतील
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील बामणोली स्टॉपजवळ उभे असलेल्या तीन डंपरमधून चोरून डिझेल काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरुख पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे डिझेल जप्त करण्यात आले आहे.
दिनांक २७ मे रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास बामणोली स्टॉप येथे उभ्या असलेल्या ३ डंपरच्या टाकीतून काही इसम डिझेल चोरत असल्याचे फिर्यादी संदीप विश्राम रावणंग आणि त्यांच्या मित्राने पाहिले. त्यांनी तात्काळ . सतर्कता दाखवत पोलिसांना याची माहिती दिली.
या प्रकरणात शंकर धेनु राठोड (वय ४७ वर्ष, रा. सातारा), शिवाजी बबन नेटके (वय ३५ वर्ष, रा. संगमेश्वर, रत्नागिरी), रोहीत हनुमंत कांबळे (वय १९ वर्ष, रा. सांगमेश्वर, रत्नागिरी), लखन हनुमंत कांबळे (वय २१ वर्ष, रा. सांगमेश्वर, रत्नागिरी) या संशयितांचा समावेश आहे.
आरोपींनी डंपर क्रमांक MH-04-EY-7311, MH-09-EM-4004 आणि MH-04-EY-7312 मधून सुमारे १९,६००/- किंमतीचे २०० लिटर डिझेल कॅनमध्ये काढून चोरण्याचा प्रयत्न केला. देवरुख पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा (रजि. नं. ८७/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार एस. एच. करांडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.









