Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बँकेतील सोने अपहारप्रकरणी संशयितास जामीन

बँकेतील सोने अपहारप्रकरणी संशयितास जामीन

२५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता, सोने तारणमधील दागिने लंपास केल्याचा आरोप

रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या. कर्ता शाखेत ५० लाख रुपयांचा अपहार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. अमोल आत्माराम मोहिते (४२, रा. टिके बौद्धवाडी) असे संशयिताचे नाव आहे. २२ ऑगस्ट रोजी अमोल याला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. कारागृहात असलेल्या अमोल याच्यावतीने जामीनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आला होता.

    जिल्हा बँकेत ग्राहकांकडील सोने तारण ठेवून त्याबदल्यात कर्ज देण्यात आले होते. १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या काळात बँकेच्या कर्ला शाखेतील तिजोरीमधील ५० लाख रुपये किमतीचे सोने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला होता. बँकेचे अधिकारी सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर (५४, रा. माळनाका रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शहर पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२), (४), (५), ३(५) नुसार बँकेचा शिपाई अमोल माहिते, शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये, कॅशियर ओंकार अरविंद कोळवणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

    जामीन अर्जामध्ये आरोपी अमोल मोहिते याच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, सहआरोपी किरण विठ्ठल बारये यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. मोहिते हा मधुमेही असून साखरेचा स्तर ५०० पर्यंत जात आहे. प्रकृतीमध्ये बिघाड होत असल्याने त्याला दोनदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर कोणतीही वस्तू हस्तगत करावयाची नाही. तसेच तो कुटुंबाचा एकमेव कमावता असल्याने जामीन देण्याची विनंती न्यायालयापुढे करण्यात आली. सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करताना न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आरोपीचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तो जामिनावर सुटल्यास पळ काढू शकतो. तपासकामात सहकार्य न करण्याची शक्यता असल्याने जामीन नाकारावा, अशी विनंती करण्यात आली.

    न्यायालयाने जामीन अर्जावर निकाल देताना नमूद केले की, आरोपी २२ ऑगस्ट २०२५ पासून कोठडीत आहे. तपासकाम पूर्ण झाले असल्याचे दिसून येत आहे. गुन्ह्यातील सोनेही पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी आजारी असल्याने कठोर अटींसह जामीन देता येईल. आरोपीने तपास अधिकाऱ्यांनी बोलावल्यास हजर राहावे व सहकार्य करावे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच न्यायालयात नियमित हजर राहावे अशा अटी न्यायालयाकडून मोहिते याला घालण्यात आल्या आहेत.