Thursday, June 4, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ‘बँक ऑफ इंडिया’चा अधिकारी असल्याचे भासवून २ लाख १७ हजारांची फसवणूक

‘बँक ऑफ इंडिया’चा अधिकारी असल्याचे भासवून २ लाख १७ हजारांची फसवणूक

खाते बंद होणार असल्याचे सांगत रत्नागिरीतील प्रौढाला ऑनलाईन गंडा

रत्नागिरी:- बँक खाते बंद होण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने रत्नागिरीतील एका नोकरदार व्यक्तीची २ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेश अर्जन सावंत (वय ५१, रा. विकास क्वॉर्टर, रत्नागिरी) हे २३ मे २०२६ रोजी आपल्या राहत्या घरी असताना त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव ‘राहुल अगरवाल’ असून आपण ‘बँक ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे सांगितले.

आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे बँक खाते बंद होणार असल्याची भीती घातली. त्यानंतर, व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून त्यामध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक टाकण्यास सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादीने लिंकवर माहिती भरताच, त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख १७ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी २ जून रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी राहुल अगरवाल याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा आपली बँक खात्याची गोपनीय माहिती (OTP, पासवर्ड) कोणालाही देऊ नका. कोणत्याही बँकेच्या नावाखाली फोन आल्यास प्रत्यक्ष बँकेत जाऊन शहानिशा करणे सुरक्षित ठरते.