शेजवली येथे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील शेजवली वरचीवाडी येथे पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला असून, परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
फिर्यादी महेंद्र भगवान गुरव (वय २६, रा. शेजवली वरचीवाडी, मूळ रा. उपळे) हे मजुरीचे काम करतात. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास, महेंद्र यांचे मालक राजेंद्र रामचंद्र देवळेकर यांनी त्यांना आरोपी जयेश महादेव राणे याच्या घरी बोलावले होते. मालक राजेंद्र आणि जयेश यांच्यात सुरू असलेल्या पैशांच्या व्यवहाराबाबत महेंद्र हे बोलण्यासाठी गेले होते.
महेंद्र हे या वादात बोलत असल्याचा राग मनात धरून आरोपी महादेव शंकर राणे (वय ६५ वर्षे) यांनी महेंद्र यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला. यामुळे महेंद्र यांना दुखापत झाली. यावेळी महादेव राणे आणि त्यांचा मुलगा जयेश महादेव राणे (वय ३५ वर्षे) या दोघांनीही फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
जखमी महेंद्र गुरव यांनी रात्री उशिरा राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी महादेव राणे आणि जयेश राणे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.









