Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गुंगीचे औषध देऊन गोवंश तस्करीचा प्रयत्न

गुंगीचे औषध देऊन गोवंश तस्करीचा प्रयत्न

जागरूक नागरिकांमुळे प्रकार उघड, अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- आतापर्यत पिकअप टेम्पोंच्या साह्याने जनावरांची तस्करी केली जात होती. मात्र आता संबंधीतांनी नवी शक्कल लढवत झायलो सारख्या अलिशान गाडीतून जनावरांची तस्करी करण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. तालुक्यातील परशुराम (दुर्गवाडी) परिसरात गोवंश तस्करीसाठी गुंगीचे औषध देण्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी पहाटे उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने काहींसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान प्रकरणी येथील पोलिस स्थानकात अज्ञात विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयीची फिर्याद सचिन शशिकांत पावसकर (३३, इलेक्ट्रेशन, परशुराम दुर्गवाडी) यांनी दिली आहे. पासवकर हे मुंबईहून भाडे सोडून गावी आल्यानंतर घरासमोरील कंपाऊंडमध्ये गाडी उभी करून गाडीतच मोबाईल बघत बसले होते. तेवढ्यात काळ्या रंगाची झायलो चारचाकी गाडी परिसरात संशयास्पदरीत्या दिसून आली. त्यामुळे त्यांनी गावातील सात-आठ लोकांना बोलावून तेथे पाहिले असता सात ते आठ जनावरे दिसून आली. त्यामुळे ते सर्वजण कठड्याच्या मागे दबा धरून बसले. त्यानंतर काही वेळाने संबंधीत जनावरांच्या हंबरण्याचा आवाज आल्याने ते सर्वजण तेथे धावत गेले. तेवढ्यात झायलो गाडी वेगाने चालवून संबंधीत तस्करीखोर पसार झाले. त्यांचा बोलेरो गाडीने पाठलाग करण्यात आला. गाडी टप्प्यात येताच त्यांच्या दिशेने दगड फेकून मागिल काच फोडण्यात आली. मात्र तरिही ते लोटे एमआयडीसीच्या दिशेने ते पळून गेले. झायलो गाडीतून १० हजार रूपये किमतीची तांबड्या रंगाची गाय गुंगीचे औषध देऊन नेण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पाहिले असता पाच जनावरे बेशुद्ध अवस्थेत आढळली. या घटनेत चार गाई व एक बैल असा एकूण पाच जनावरांचा समावेश असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तसेच या परिसरातील सिसिटिव्ही फुटेज तपासून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

याप्रकरणी प्राण्यांना क्रुरतेने वागवण्याचा प्रतिबंधक अधिनियम ११ (१), (क), (ड) व भारतिय न्याय संहिता अधिनियम ३०३ (१), ३ (५) अन्वये अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भरतेश हारूगिरे हे करीत आहेत.