Wednesday, June 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमचा मृत्यू; दुर्घटनेतून सहाजण बचावले

पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमचा मृत्यू; दुर्घटनेतून सहाजण बचावले

कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील घटना

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी येथील नदीवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या छोट्या पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा जागीच मृत्यू झाला. पहिल्याच पावसात नदीपात्रात पाणी वाहू लागल्यामुळे पुलाजवळ अडकलेला गाळ काढताना लोखंडी खांब सटकल्याने हा स्लॅब कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेतून २ कामगार आणि ४ पादचारी बचावले.

अक्षय शिवाजी काटे (वय २६, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) असे या दुर्घटनेत मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास घडली. तालुक्यातील कुर्धे परिसरात लिंगायतवाडी-खोताचीवाडी, फडकेवाडी आदी भागांतील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी साकव योजना कार्यक्रमांतर्गत ५५ लाख रुपयांच्या निधीतून पूल उभारण्यात येत होता. या पुलावर केवळ पहिला स्लॅब टाकण्यात आला होता, तर उर्वरित काम अर्धवट होते. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला प्रचंड पाणी आले. पहिल्याच पुरात वाहून आलेला कचरा आणि गाळ पुलाच्या लोखंडी खांबांमध्ये अडकल्याने अर्धवट पुलाला धोका निर्माण झाला होता. हा गाळ काढण्यासाठी आज (ता. ९) सकाळी साडेनऊच्या सुमारास सुपरवायझर अक्षय काटे हे दोन कामगारांसह तेथे पोहोचले. श्री. काटे हे अडकलेला गाळ काढत असतानाच, खाली लावलेले लोखंडी खांब अचानक सटकले आणि पुलाच्या एका भागाचा जड स्लॅब थेट त्यांच्या अंगावर कोसळला. शेजारी काम करणाऱ्या कामगारांनी तातडीने धाव घेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण स्लॅब अंगावर पडल्यामुळे अक्षय काटे याचा ढिगाऱ्याखाली गुदमरून जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस अंमलदार, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, स्वाती शिंदे, विलास वारीसे, प्रवीण शिंदे, ग्रामस्थ विजय शिंदे, हेमंत अभ्यंकर, आशुतोष अभ्यंकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्री. काटे यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठवला. या दुर्घटनेमुळे खोताचीवाडी आणि फडकेवाडी या भागातील सुमारे १०० ते सव्वाशे लोकांचा संपर्क तुटला आहे.