चिपळूण:- मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गॅबियन वॉलचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून ते अतिशय वेगाने सुरू आहे. घाटात आता दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत चिपळूण हद्दीत प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या विविध कामांना आता वेग आला आहे. या अंतर्गत कोकणातील अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या परशुराम घाटात गॅबियन वॉलचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या महामार्ग चौपदरीकरणाचे काम चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यांत दोन वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र घाटाची तोडफोड सुरू झाल्यापासून या कामात अनेक तांत्रिक व नैसर्गिक विघ्ने येत गेली आहेत. काम सुरू असताना वारंवार दरडी कोसळल्यामुळे घाटात बांधण्यात आलेल्या अनेक संरक्षक भिंती नेहमीच धोक्यात राहिल्या होत्या तसेच डोंगरातून दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात सातत्याने घडत असल्यामुळे अखेर केंद्र सरकारकडून यावर उपाय शोधण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती.
गतवर्षी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन कंत्राटदार कंपनीने केले होते, मात्र मे महिन्याच्या मध्यावर अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील कामाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले होते. अर्धवट स्थितीत असलेली गॅबियन वॉल कोसळल्या मुळे महामार्ग विभागाने सर्व कामे थांबवून केवळ एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती.
पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत काही किरकोळ आणि महत्त्वाचे बदल करून पुन्हा वेगाने काम सुरू करण्यात आले.सध्या परशुराम घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले करण्यात आले असून, उर्वरित कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्याच्या दृष्टीने महामार्ग पूर्वपदावर आणण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व कंत्राटदार कंपनीने केले आहे.
परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल. पाण्याच्या नैसर्गिक मार्गावर व झऱ्यांच्या ठिकाणी पाईप टाकून पावसाळ्यात पाणी सहजपणे वाहून जाईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली असून, यामुळे या मार्गावरील प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे कार्यकारी अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.









