रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाट परिसरात दरड कोसळल्याची घटना नुकतीच घडली. रस्त्यावर आलेल्या माती आली आहे. तसेच ओंडका रस्त्यावर आल्याने त्यावर आदळून दुचाकीस्वार जखमी झाला आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली, तरी घाट परिसरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मुसळधार पावसामुळे या दरडीची सैल झाल्याने सध्या ही दरड हळूहळू रस्त्यावर कोसळत आहेत. असाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास मोठी दरड कोसळून रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. तसेच मोठी दरड कोसळल्यास वाहने आदळून दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही दरड निवळी घाटात पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी झिगझॅग व्यवस्था केलेल्या ठिकाणीच पडली आहे. दरडीची माती रस्त्यावर साचत असल्याने वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. तसेच रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग प्रशासन व पोलिस विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.









