रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथील श्री नवलादेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला; मात्र देवस्थान समितीने बसवलेल्या मजबूत दानपेटीमुळे चोरट्याचा डाव फसला.
तालुक्यातील नाखरे येथील प्रसिद्ध नवलादेवी मंदिरात सोमवारी चोरट्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही येथे अनेकदा चोरीचे प्रयत्न झाल्याने समितीने खबरदारी म्हणून मजबूत पत्र्याचे कवच असलेली दानपेटी बसवली होती. त्यामुळेच या वेळीही चोरट्याला दानपेटी फोडण्यात यश आले नाही. चोरट्याने हत्याराच्या
साहाय्याने दानपेटी तोडण्याचा प्रयत्न केला; परंतु कवच मजबूत असल्याने ती फोडता आली नाही आणि चोरटा तेथून निघून गेला. यासंदर्भात गावचे पोलिसपाटील सुधीर वाळिंबे म्हणाले, दानपेटी फोडण्याचा धोका लक्षात घेऊन देवस्थान समितीने दर्जेदार साहित्यातून दानपेटी तयार केली आहे. त्यामुळेच हा प्रयत्न अयशस्वी झाला.
सुरक्षिततेचा भाग म्हणून मंदिरातील दानपेटी दर दोन महिन्यांनी उघडून त्यातील रक्कम बँकेत जमा केली जाते. आजही ठरल्याप्रमाणे दानपेटी उघडून त्यातील रक्कम बँकेत जमा करण्यात आल्याचे समितीने सांगितले.









