Friday, August 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी देवरुखात तीन बंद घरे फोडून २.८७ लाखाचा ऐवज लंपास

देवरुखात तीन बंद घरे फोडून २.८७ लाखाचा ऐवज लंपास

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात चोरट्यांनी एकाच वेळी तीन बंद घरांना लक्ष्य करत धुमाकूळ घातला. यापैकी एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २ लाख ८७ हजार २५० रुपये किमतीचे चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली, तर अन्य दोन घरांत चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरूख येथील अपर्वाई बंगला येथे राहणारे फिर्यादी अविनाश भालचंद्र बोंद्रे (वय ६२) हे आपल्या पत्नीसह मुंबईला मुलीकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दि. २ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कठीण हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटे फोडून त्यातील चांदीची भांडी आणि ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ८७ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी शेजाऱ्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसल्यावर त्यांनी बोंद्रे यांना माहिती दिली. त्यानंतर बोंद्रे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

देवरुख शहरातीलच विवेक भागवत यांच्या घरासह आणखी एका ठिकाणी चोरट्यांनी घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. एकाच वेळी तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांनी मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. चोरीचा छडा लावण्यासाठी शनिवारी रत्नागिरीतून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. देवरूख पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमान्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.