Monday, November 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अवघ्या दोन तासांत घरफोडीचा छडा लावून आरोपी जेरबंद

अवघ्या दोन तासांत घरफोडीचा छडा लावून आरोपी जेरबंद

४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

चिपळूण:- पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीस गेलेला तब्बल 4 लाख 45 हजार 842 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मार्गताम्हाणे, गोपाळवाडी परिसरात अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून अंदाजे ३ तोळे वजनाचे दोन पदरी पट्टीचे सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने मिळून एकूण ४,२०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. सौ. शैला दिलीप तावडे (वय ४० वर्षे, रा. मार्गताम्हाणे गोपाळवाडी, ता. चिपळूण) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा उलगडा करत संशयित आरोपी नितेश अंकुश साबळे (वय ३१, रा. मार्गताम्हाणे गोपाळवाडी, सध्या रा. खांदाटपाली) याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला 4 लाख 45 हजार 842 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली. घरफोडीच्या घटनेनंतर अत्यंत वेगाने तपास करत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचल्याने त्यांच्या कार्यक्षम तपासाचे कौतुक होत आहे.

​या प्रकरणी दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०२ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३९/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपास करत दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता आरोपी नितेश अंकुश साबळे याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.