दापोलीत भावाने केला भावाचा खून

दापोली:- जिल्ह्याला हादरवणारी घटना पुन्हा समोर आली आहे. दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद गणपत तांबे (वय 36, रा. उन्हवरे बौद्धवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृताचा भाऊ आरोपी रवींद्र तांबे (वय 42) याला अटक केली आहे.

शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास दोघा भावात वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रवींद्रने रागाच्या भरात धारदार कुऱ्हाडीने आणि फरशीने विनोदच्या डोक्यात वार केले, ज्यामुळे विनोद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह दापोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्र तांबेला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल करण्यात आला आहे.