Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वसतीगृह कर्मचारी मारहाणीतील संशयितांना जामीन

वसतीगृह कर्मचारी मारहाणीतील संशयितांना जामीन

महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयितातून झाली होती मारहाण

रत्नागिरी:- महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयातून रत्नागिरीतील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रताप सुदाम कांबळे, संकेत संगम कांबळे व शुभमम दिलीप पडाळकर अशी संशयितांची नावे आहेत. न्यायाल्याने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता केली.

रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी संशयितांच्या जामीन अर्जावर निकाल दिला. रितेश मधुकर सोनावणे (रा. सम्यकनगर कारवांचीवाडी) यांनी मारहाण प्रकरणी तक्रार दाखल केली होती. रितेश हे शासकीय मुलांचे वसतीगृह येथे कनिष्ठ लिपीक म्हणून काम करतात. २६ जानेवारी २०२५ रोजी रितेश वसतीगृहाच्या खोली नंबर ४ मध्ये कार्यालयीन काम करत होते. सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हे त्याठिकाणी आले.

आरोपी यांनी रितेश याला तू मोबाईलवरुन मॅसेज का पाठवतो अशी विचारणा केली. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच लाथा बुक्क्यांनी रितेश याला संशयितांनी मारहाण केली. तसेच शुभम पडाळकर याने जातीवाचक शिवीगाळ करत ‘तुझ्या अंगात जाम मस्ती आहे, तुझा आज माज उतरवितो’ असे बोलून मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या रितेश याने याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम १३२, ११८(१), ११५(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपी शुभम पडाळकर यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संशयित आरोपी यांच्याकडून न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाकडून २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.