दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यासह दापोली तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी देखील कायम आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जलगाव येथील समर्थ नगर परिसरात पावसाचे पाणी घरांच्या आणि इमारतींच्या आवारात शिरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये तब्बल दोन ते तीन फूट पाणी साचल्याने रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काही घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे घरगुती साहित्याचेही नुकसान झाले आहे.
केळसकर नाका परिसरातही मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे सहरकर नगर, शराफत बुरोंडकर परिसर, गिम्हवणे गल्ली क्रमांक २ येथेही पाणी भरले असून शराफत बुरोंडकर यांच्या घरात पाणी शिरल्याने कुटुंबीयांची धावपळ उडाली.
शहरातील काळकाई कोंड पुलाजवळील गुडलक स्टोअरसमोरील परिसर, केळसकर नाका येथील स्टेट बँकेसमोरील रस्ता तसेच नशेमन कॉलनी मशिदीसमोरील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गटारे तुंबल्याने आणि पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून काही ठिकाणी वाहनचालकांना वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. सखल भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









