Thursday, October 22, 2026
spot_img
Home दापोली दापोलीत विवाहित महिला बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

दापोलीत विवाहित महिला बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील नानटे जांभळवाडी येथून एक ३५ वर्षीय महिला अचानक घराबाहेर पडल्याची व माहेरीही पोहोचली नसल्याची घटना समोर आली आहे. संध्याकाळची वेळ असल्याने बाहेर न जाण्यास सांगूनही ती कोणालाही न सांगता निघून गेल्याने आणि माहेरच्या घरीही न पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नानटे जांभळवाडी (ता. दापोली) येथील रहिवासी असलेल्या शिल्पा संदेश भेकरे (वय ३५) असे या अपहरीत महिलेचे नाव आहे. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १६ वाजण्याच्या सुमारास त्या खेड तालुक्यातील किंजळे कळकराय (पोस्ट शिंगरी) येथील आपल्या माहेरी जाते असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या.

​संध्याकाळची वेळ असल्याने घराबाहेर जाऊ नका, असे तिच्या पती व कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, तिने कोणाचेही ऐकले नाही आणि ती घराबाहेर निघून गेली. त्यानंतर ती खेड येथील माहेरी पोहोचली किंवा कसे, याबाबत खात्री करण्यासाठी फिर्यादी तथा सासू वैजयंती शिवाजी भेकरे (वय ५५) यांनी तिच्या आईकडे चौकशी केली. मात्र, ती माहेरी पोहोचलीच नसल्याचे समोर आले.

​कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी नानटे आणि परिसरामध्ये तिचा कसून शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर याप्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ७.१२ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) तसेच भा.द.वि.का.कलम ३६५ नुसार अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.