Tuesday, June 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी तंबाखूखोरांना ‘कोटपा’चा दणका, ३ लाखांचा दंड वसूल

तंबाखूखोरांना ‘कोटपा’चा दणका, ३ लाखांचा दंड वसूल

रत्नागिरीत १४७ कर्करोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष आरोग्य मोहिमेत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आरोग्य शिबिरांमधून १,३५९ व्यक्तींमध्ये मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आली असून, यापैकी १४७ कर्करोग रुग्णांचे अचूक निदान करून त्यांना तातडीने आवश्यक उपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, जिल्ह्यात ‘कोटपा’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या २,६७२ जणांवर धडक कारवाई करून एकूण ३ लाख १९ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तंबाखूमुक्तीच्या देशाने पाऊल टाकत रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २,८४५ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांनी ७१,४२५ नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी केली आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सल्ला मिळण्यास मदत झाली असून ८७,८६२ नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक तंबाखू निषेध दिन’ संपन्न
याच पार्श्वभूमीवर, जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांच्या धोक्याची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन भरणे यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज औधोरेखित करत, युवकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. समुपदेशक श्रीमती प्राची भोसले यांनी मुखाच्या कर्करोगाची लक्षणे व वेळेवर उपचाराचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, आरएमओ डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, समुपदेशक रामेश्वर म्हेत्रे आणि राम चिंचोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रत्नागिरी जिल्ह्याची कारवाई व कामगिरी एका नजरेत:

-एकूण मौखिक तपासणी: ७१,४२५ नागरिकांची आरोग्य शिबिरांद्वारे तपासणी.
-कर्करोग रुग्ण शोध:१४७ रुग्णांचे निदान करून थेट उपचार सुरू.
-सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान कारवाई: २,५१८ व्यक्तींवर कारवाई, ₹२,८९,२३० दंड वसूल.
-शाळा-कॉलेज परिसरातील दुकानांवर कारवाई: १५४ दुकानांवर कारवाई, ₹३०,६०० दंड वसूल.

तंबाखूमुक्ती समुपदेशन: ८७,८६२ नागरिकांना व्यसन सोडण्यासाठी थेट मार्गदर्शन.