दापोली:- प्रवाशांची वाहतूक करण्यावरून झालेल्या वादातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करत कटर ब्लेड दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दापोलीतील फणस नाका येथे घडला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश दत्ताराम शिगवण (वय ३६, रा. मगीज मांडवकरवाडी, ता. दापोली) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. ते २० ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईहून स्वतःच्या ट्रॅव्हल्समधून प्रवासी घेऊन दापोलीत आले होते. प्रवाशांना उतरवून ते आपल्या टेम्पो ट्रॅव्हल्सने विश्रांतीसाठी उमरवरे येथील मित्र प्रभाकर वानकर यांच्या घरी निघाले होते.
सकाळी ११:४५ च्या सुमारास ते फणस नाका येथे आले आणि त्यांनी रस्त्याच्या बाजूला टेम्पो ट्रॅव्हल्स उभी केली. त्यावेळी तिथे आलेला दुसरा ट्रॅव्हल व्यावसायिक रवी किरण उके (रा. फणस, ता. दापोली) याने “या ठिकाणी गाडीत प्रवासी भरायचे नाहीत आणि वाकवली गावाच्या पुढे तू यायचं नाही,” असे म्हणत सतीश शिगवण यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने “तू उगाच माझ्याशी भांडू नको,” असे म्हटल्याचा राग आल्याने आरोपीने हातातील बांबूने सतीश शिगवण यांच्या दोन्ही पायांवर, कंबरेत, मांडीवर, पोटरीवर, दोन्ही हातांवर व डोक्यात जोरदार मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत हातातील कटर ब्लेड अंगावर घेऊन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११७(२), ३५१(२), ३५२, १३१ (जुने कलमानुसार ३२४, ५०६, ५०४, ३५२) नुसार आरोपी रवी किरण उके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









