मुरुगवाडा परिसरात पोलिसांची कारवाई ; दुचाकीसह १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा- पांढरा समुद्र परिसरात ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत अमली पदार्थासह दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २२) दुपारी अडीच च्या सुमारास मुरुगवाडा -पांढरा समुद्र परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही कारवाई करण्यात आली. ऋषिकेश संतोष चव्हाण (वय २२, रा. भैरी मंदिराजवळ, मुसळवाडा, रत्नागिरी) याच्याकडे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६० हजार रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याचे निव्वळ वजन ३ ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये २ ग्रॅम वजनाची पारदर्शक प्लास्टिक पिशवी असून, त्यासह एकूण वजन ५ ग्रॅम असल्याची नोंद आहे. तसेच अमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली आणखी एक पांढऱ्या रंगाची पारदर्शक प्लास्टिक पिशवीही जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत ९० हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची दुचाकी (क्र. एमएच ०८ बीएल ५५१३) आणि तिची चावीही पोलिसांनी ताब्यात घेतली. अमली पदार्थ व दुचाकीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई पथकात पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांचा समावेश होता. याप्रकरणी पोलीस हवालदार दिनेश आखाडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस अमंलदार करत आहेत.









