Wednesday, June 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी टायरने भरलेल्या ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

टायरने भरलेल्या ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील घटना

रत्नागिरी:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाटा येथे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास टायरने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, KA. 22. AB -1643 क्रमांकाचा आयशर ट्रक बेळगावहून रत्नागिरीकडे सुमारे विस लाख रुपये किंमतीचे नवीन टायर घेऊन जात होता. चालक येलगुंड यल्लाप्पा धनोरधर हे वाहन चालवत असताना आवळी फाट्यानजीक ट्रकची दुभाजकाला (डिव्हायडर) धडक झाली. धडकेनंतर ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

केबिनमधील आग काही क्षणांतच ट्रकमधील टायरपर्यंत पोहोचल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस अंमलदार अतुल निकम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कोल्हापूर व मलकापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले.

यावेळी हायवे ट्रॅफिक विभागाचे पोलीस अंमलदार दीपक पाटील, सत्यजीत भाट, अनिकेत डोंगळे, तसेच बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका, डॉ. अजिंक्य पाटील, सुपरव्हायझर संपत पाटील, लता धुमाळ आणि कोडोली पोलिसांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, ट्रक आणि त्यातील मोठ्या प्रमाणातील टायर जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत.