Saturday, June 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील 54 धरणांमध्ये 35 टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील 54 धरणांमध्ये 35 टक्के पाणीसाठा

रत्नागिरी:- राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून कोकण किनारपट्टीवर पावसाने संथ गतीने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-मोठय़ा 54 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 34.86 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण 477.37 दलघमी उपयुक्त साठवण क्षमतेपैकी सध्या 158.72 दलघमी पाणी उपलब्ध आहे. आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास धरणांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकूण 68 मध्यम ते लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक जलक्षमता असलेल्या प्रकल्पांचा विचार केला असता, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी हा सर्वात मोठा प्रकल्प तब्बल 58.13 टक्के भरला आहे. त्यात 48.19 दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प 44.62 टक्के साठय़ासह (32.37 दलघमी) दुस्रया क्रमांकावर आहे. याउलट खेड तालुक्यातील नातुवाडी मध्यम प्रकल्पात 26.55 टक्के (7.23 दलघमी) आणि पिंपळवाडी प्रकल्पात 21.37 टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे. लांजा येथील मुचकुंदी प्रकल्पामध्ये 30.05 टक्के पाणी शिल्लक असून धरणांची ही आकडेवारी पाहता सध्यातरी पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे.
1 जून 2026 पासून जिह्यात पावसाने तुरळक ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली आहे. गुहागर तालुक्यात सरासरी सर्वाधिक 124.5 मिमी आणि रत्नागिरी तालुक्यात 117 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात मात्र अवघा 4.8 मिमी पाऊस पडला आहे. अहवालानुसार, मंडणगडमधील पणदेरी धरणाचा सांडवा आधीच छेद देण्यात आलेला असल्यामुळे तेथील पाणी वाहून जात आहे, तर खेडमधील तिडे धरणाच्या सांडव्यालाही 125.8 मीटरवर छेद देण्यात आला असून तेथून सध्या 0.828 घमी/सेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. तसेच भोळवली धरणातून 2.022 घमी/सेकंद विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाने नमूद केले आहे.

मागच्या वर्षाच्या तुलनेत पाणी परिस्थिती गतवर्षीच्या (सन 2025) याच दिनांकाच्या आकडेवारीशी तुलना केली असता, यंदा बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा बऱ्यापैकी स्थिर आहे. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांनी तळ गाठला नव्हता. त्यामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य झाला आणि मान्सूनच्या सुरुवातीलाच धरणांमध्ये 35 टक्क्यांहून अधिक साठा राखण्यात यश आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, जलसंपदा विभाग आणि पाटबंधारे मंडळाकडून सर्व धरणांच्या विसर्गावर आणि पाणीपातळीवर चोवीस तास बारीक लक्ष ठेवले जात आहे.