Thursday, May 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्लॅक पँथर’चा वावर वाढला; २५ हून अधिक काळ्या बिबट्यांची शक्यता

जिल्ह्यात ‘ब्लॅक पँथर’चा वावर वाढला; २५ हून अधिक काळ्या बिबट्यांची शक्यता

रत्नागिरी:- मागील काही महिन्यात कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळे बिबटे आढळून येण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या काळ्या बिबट्यांची संख्या कोकणात गेल्या काही वर्षांत लक्षणीयदृष्ट्या वाढल्याचे दिसून येत आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही काळ्या बिबट्याची (मेलेनिस्टिक लेपर्ड) नोंद झाली आहे. या नोंदीमुळे जैवविविधतेला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

वन्यप्राण्यांसाठी सह्याद्री ते कोकण भ्रमणासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. कर्नाटकाकडून येणारे तिलारी, आंबोलीमार्गे स्थलांतर होणारे वन्यजीव सह्याद्रीत काही काळ थांबून ते पुढे कोकणच्या दिशेने येत असल्याच्या नोंदी आहेत. या वन्य प्राण्यांमध्ये काळ्या बिबट्याची नोंद सापडली आहे.

काळा बिबट्या तथा ब्लॅक पॅंथर ही स्वतंत्र प्रजाती नव्हे तर बिबट्याचाच एक प्रकार मानला जातो. मेलानिन हे रंगद्रव्य शरीरात अधिक प्रमाणात झाल्याने त्याचा रंग पूर्णतः काळा दिसतो. काळ्या रंगाच्या ठिपक्यांचा पॅटर्न काही वेळा आढळतो. त्याची उपस्थिती ही वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा पुढील टप्पा गणला जात आहे.

काळे बिबट्या हे दाट जंगलात राहणे पसंत करतात. त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे ही सर्वात मोठी गरज आहे. कोकणात काळे बिबटे दिसणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. बिबट्या आणि मानवातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभाग जखमी झालेल्या किंवा गावांत शिरलेल्या बिबट्यांची सुटका करते. जिल्ह्यात असे बिबटे कुठे आढळले तर त्यांना मारू नका. जखमी अवस्थेत किंवा अडचणीच्या ठिकाणी असतील तर वन विभागाशी संपर्क करा.-सर्वर खान, परिक्षेत्र वनाधिकारी, चिपळूण

कोकणात २५ हून अधिक काळे बिबटे?

वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार कोकणात साधारणपणे पंधरा ते वीस काळे बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रमाण अधिकही असण्याची शक्यता आहे. काळ्या बिबट्यांचे प्रमाण हे सदाहरित आणि निमसदाहरित वनांत अधिक आढळून येते. दाट झाडीत लपण्यासाठी काळा रंग हा उपयुक्त ठरतो, कोकणातील बहुतांश वने ही सदाहरित वनक्षेत्रात मोडतात. त्यामुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात, तसेच कर्नाटकात काळे बिबटे अधिक प्रमाणात आढळून येतात.

रत्नागिरी जिल्ह्यात संख्या लक्षणीय

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, देवरूख, लांजा, गुहागर, संगमेश्वर, दापोली, खेड या परिसरात काळ्या बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. महाराष्ट्रात विदर्भात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात, पश्चिम महाराष्ट्रात कोयना, राधानगरी आणि चांदोली अभयारण्यात काळे बिबटे आढळून आले आहेत; पण रत्नागिरी जिल्ह्यात काळ्या बिबट्यांची संख्या लक्षणीय असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.