आरडीसीसी बँकेने दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल
देवरूख:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या देवरूख शाखेने दाखल केलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात देवरूख न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपीला दोषी ठरविले आहे. मा. न्यायदंडाधिकारी वर्ग-१, देवरूख यांनी आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना तब्बल ३९.५० लाख रुपयांचा दंड तसेच साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास वाढीव कैदेची शिक्षा भोगावी लागणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरूख शाखेमार्फत आरोपीला वाहन कर्ज मंजूर करण्यात आले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने बँकेला दिलेला धनादेश खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने अनादरित (बाऊन्स) झाला होता. यानंतर बँकेने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत देवरूख न्यायालयात दावा दाखल केला होता.
या खटल्यामध्ये बँकेच्या वतीने ॲड. वाय. जी. चंदगडकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. सादर करण्यात आलेले दस्तऐवज, पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दंड आणि कैदेची शिक्षा सुनावली.
निर्णय देताना न्यायालयाने चेकद्वारे दिलेले आर्थिक आश्वासन पाळणे आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे हे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. या निकालामुळे आर्थिक व्यवहारांमधील शिस्तीला बळ मिळणार असून बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
चेक बाऊन्सच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात असून थकीत कर्जदारांसाठी तो एक स्पष्ट इशारा ठरत आहे. बँकांची थकीत कर्जे वेळेत फेडावीत आणि आर्थिक व्यवहारांमध्ये जबाबदारीने वागावे, असा संदेश या निर्णयातून अधोरेखित झाला आहे.









