Thursday, September 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळूणमधील खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

चिपळूणमधील खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

रत्नागिरी:- चिपळूण येथील बहुचर्चित हत्येच्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदकुमार बाबाजी तांडेल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित करत उच्च न्यायालयाने आरोपी तांडेल याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज पी. ढोटे यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, चिपळूण येथील अपर सत्र न्यायालयाने सत्र प्रकरण क्रमांक ४२/२०२० मध्ये ६ मे २०२३ रोजी निकाल देताना नंदकुमार तांडेल याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व १० हजार रुपये दंड, कलम ३०७(हत्येचा प्रयत्न) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि कलम ४५२ (गुन्हेगारी उद्देशाने घरात घुसखोरी) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या दंडात्मक शिक्षेविरोधात आरोपीने वकील रोहन सुर्वे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते.

दीर्घकालीन कारावासाच्या कारणाचा विचार करून न्यायालयाने तांडेल याचा जामीन अर्ज मंजूर केला. ३० हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर आरोपीची सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले असून, जामिनाची कायदेशीर प्रक्रिया संबंधित विचारण न्यायालयात पूर्ण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.