अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे अडीच ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हातखंबा शाखेच्या शाखा व्यवस्थापक शितल रमाकांत शिंदे (वय ४५) या घरी असताना, बँकेतील सहकाऱ्यांनी त्यांना फोन करून बँकेच्या इमारतीतील एटीएम मशिन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच फिर्यादी यांनी तात्काळ बँक गाठली आणि पाहणी केली. त्यावेळी अज्ञात आरोपीने एटीएम मशिन फोडून त्यातील रोख रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी शितल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३३४(१) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.









