रत्नागिरी:- तालुक्यातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना एका ३५ वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन अचानक खाली कोसळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५, रा. चवंडेवठार) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मित चवंडे हे आपल्या मित्रांसोबत लक्ष्मी चौकात क्रिकेट खेळत होते. यादरम्यान त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. ही बाब त्यांच्या मित्रांपैकी एक असलेल्या युगेश सावंत यांनी स्मित यांचे भाऊ सुशांत चवंडे यांना फोन करून कळवली.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून स्मित चवंडे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.









