कापणीला आलेल्या भात पिकाची मोठी नासाडी
रत्नागिरी:- बंगालच्या उपसागारत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाखाली कोकण किनारपट्टी भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे सातत्य होते. हवामान खात्याने दिलेल्या यलो अलर्टनुसार रविवारी आणि सोमवारी देखील जिल्ह्यात पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी भातशेती आडवी झाली आहे. काही भागात ऐन कापणीला आलेले भातपीक ही आडवे झाले आहे. त्याचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच यलो अलर्ट दिला होता. हा इशारा देण्यात आल्यानंतर शनिवार आणि रविवारी रत्नागिरीत दिवसभर मळभी वातावरण होते. रविवारी जिल्ह्याच्या अनेक भागात हलक्या आणि मध्यम सरींनी हजेरी लावली होती. सोमवारी मात्र पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ठिय्या मांडला. सोमवारी सायंकाळी अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री अनेक भगात जोरदार पाऊस झाला. खबरदारी म्हणून महावितरणने ग्रामीण भागात वीज प्रवाह खंडित केला. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात त्यामुळे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अंधारच होता.
यंदाच्या वर्षी पाऊस फारच कमी प्रमाणात झाला आहे. त्यातच भातशेतीचे क्षेत्रही वाढले आहे. मात्र, परतीच्या पावसाने पाणी टंचाईबाबत दिलासा दिला असला तरी परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत आहे. रत्नागिरीत सोमवारी संंध्याकाळी सुरू झालेला पाऊस रात्रीही मुसळधार कोसळत होता. आता भातशेती अंतिम टप्प्यावर आली आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने ही भातशेती आडवी झाली आहे.









