अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरवेली परिसरातून एक महागडी दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या अंगणात उभी केलेली रॉयल एनफिल्ड बुलेट अज्ञात चोरट्याने पळवून नेली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी नामदेव सिद्धराम भोसले (वय ३३ वर्ष, रा. नवीन वसाहत, दुर्गामाता नगर, चरवेली, ता. जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. भोसले यांनी आपली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट दुचाकी (क्र. MH 08 AS 7763) नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात उभी केली होती. दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजेपासून ते १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली.
चोरट्याने संधी साधून घराच्या अंगणातून ही गाडी कोणाच्याही लक्षात येऊ न देता चोरून नेली. फिर्यादी यांनी गाडीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
शहरात आणि ग्रामीण भागात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









