Friday, October 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक

२० हजारांचा ऐवज लांबवला; कोळकेवाडीतील घटना

चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई मंदिराजवळ राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या बंद घराचे मागील दार तोडून घरात घुसखोरी करत चोरी केल्याची आणि फिर्यादीला शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोळकेवाडी येथील वाघजाई मंदिराशेजारी राहणाऱ्या श्रीमती सुभद्रा सुधाकर कदम (वय ७०, व्यवसाय: गृहिणी) यांच्या राहत्या घरात २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ या कालावधीत घरफोडी झाली. फिर्यादी घराबाहेर असल्याचा गैरफायदा घेत आरोपी गणेश प्रकाश कदम (वय ४०, रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याने फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा कशाने तरी तोडून आत प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याची खात्री करून त्याने लबाडीच्या इराद्याने घरफोडी केली.
दरम्यान, चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी वृद्धेने विचारणा केली असता, आरोपी गणेश कदम याने श्रीमती सुभद्रा कदम यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना मारहाण करण्यासाठी अंगावर धावून गेला. या घटनेमुळे घाबरलेल्या वृद्धेने अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:२५ वाजता याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घरफोडीत आरोपीने घरातील एकूण २०,००० रुपये किमतीचे वापरते तांबे, पितळ व स्टीलचे भांडे लंपास केले. यामध्ये सुमारे १२,००० रुपये किमतीचे तांब्याचे ४ मोठे हंडे व ३ कळश्या, ७,००० रुपये किमतीचे पितळेचे २ मोठे टोप व ३ मोठ्या बादल्या आणि १,००० रुपये किमतीच्या स्टीलच्या ३ लहान बादल्यांचा समावेश आहे.
पोलीस तपासात आरोपी गणेश कदम हा अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असून त्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
या घटनेप्रकरणी अलोरे शिरगाव पोलिसांनी गु.र.नं. ११५/२०२६ नुसार नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४), ३५२, १३१ (तसेच भा.द.वि. कलम ३८०, ४५४, ४५७, ५०४, ३५२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून घरफोडी करणे आणि तिला धमकवण्याच्या या प्रकारामुळे कोळकेवाडी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.