बाबाजीराव जाधव; जिल्हा बँकेचा सहकार मेळावा उत्साहात
रत्नागिरी:- जिल्ह्यात स्व. गोविंदराव निकम यांनी सहकार रुजवण्यात मोठी कामगिरी केली. त्यानंतर डॉ. चोरगे यांच्या नेतृत्वाखाली कठीण अवस्थेतून बँकेला चांगले काम करुन राज्यात दोन नंबरवर नेण्यात यश आले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार ग्रामीण भागात रुजला असल्याचे मत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिवसानिमित्ताने आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते.
सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्था सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास व व्यवसाय वृध्दी यावर मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्यासह बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, रमेश दळवी, आबा टिकेकर, गजानन पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
मराठा भवन येथे पार पडलेल्या या सहकार मेळाव्यात मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष जाधव म्हणाले की केंद्रात सहकार कायद्याला नव्याला उजाळा देण्यात आल्यानंतर मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. केंद्रात शरद पवार मंत्री असताना कृषी व सहकार खात्यासाठी त्यांनी मोठे काम केले असल्याची आठवणही त्यांनी यावेळी काढली. त्यामुळे कोकणात सहकार रुजण्यात मोठे यश आले आहे. डॉ. चोरगे यांच्या नेतृत्वाखाली संचालकांसह अधिकारी व कर्मचारी चांगले काम करीत असल्याची कौतुकाची थापही त्यांनी मारली. दरवर्षी नाबार्ड, आरबीआय, सहकार विभागाकडून बँकेचे लेखापरिक्षण होत असते, त्याठिकाणी बँकेचे कामकाज नेहमीच अव्वलदर्जाचे ठरले आहे. कोकणात पाचही जिल्ह्यात रत्नागिरीची बँक अग्रेसर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी अनेक योजना सुरु असून त्या सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बँक सातत्याने नवे उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, सहकार म्हटले की पश्चिम महाराष्ट्रकडे पाहिले जाते. परंतु जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारी संस्थांना पुरक ठरावे असे मोठे काम या ठिकाणी झालेले आहे. आज जिल्हा बँक सभासदांना 30 टक्केपर्यंत डिव्हीडंट देत आहे हे बँकेचे यश आहे. आजही दोन हजारपेक्षा जास्त सहकारी संस्था कार्यरत आहेत, हा जिल्ह्यातील सहकाराचा झालेला विकास असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे हे 30 जुन रोजी सेवानिवृत्त होत असल्याने बँकेच्या वतीने व अन्य सहकारी संस्थांच्यावतीने त्यांचा सहकार मेळाव्यात सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या सरकारी नोकरीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून झाली आणि निवृत्तीही याच जिल्ह्यात होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. यावेळी सहकारी संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले. सरव्यवस्थापक समीर दळवी यांनी आभार मानले.









