चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत आगवे (ता. चिपळूण) येथील पॅसिफिक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या बाजूला असलेल्या ‘साई मोटरॲन्ड स्पेअर पार्ट’ या दुकान व गॅरेजचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील १ लाख ४ हजार ९ रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. फिर्यादी वैभव प्रभाकर डोगरे (वय ४५, रा. मांडकी कासारवाडी, ता. चिपळूण) यांचे हे बंद असलेले दुकान व गॅरेज आहे. अज्ञात व्यक्तीने हत्याराच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटले आणि दुकानातील विक्रीसाठी ठेवलेला मोटरपार्ट्सचा माल व रोख रक्कम चोरून नेली.
व्हॅलव्होलिन कंपनीच्या ९ ऑईल पॅकिंग बकेट, ५ ऑईल पॅकिंग कॅन, बॉल जॉइंट सेट पॅकिंग बॉक्स, टायर रॉड एंड पॅकिंग सेट, टेम्पो ट्रॅव्हलर क्लच पॅकिंग सेट, क्लच पॅकिंग सेट, पिकअप पॅकिंग एंड सेट, ब्रेक पॅकिंग बूस्टर, दोन ब्रेक पॅकिंग रोटर, दोन ब्रेक लायनिंग पॅकिंग सेट, डिक्स पॅकिंग रोटर,
गल्ल्यातील ३,००० रुपये असा एकूण किंमत १,०४,००९ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरांचा शोध घेतला जात आहे.









