Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गुहागर येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

गुहागर येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

लोणावळा येथील प्रकार; पाच जणांचा शोध सुरू

गुहागर:- चारचाकी वाहन वळवताना जागा देण्यावरून झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर-कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५) यांचा खून करण्यात आला. कमलेश यांचे अन्य दोन सहकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणात लोणावळा पोलिसांनी या घटनेमधील नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (ता. २५) रात्री उशिरा घडली. पर्यटनाला गेलेल्या तरुणाचा खून झाल्यामुळे कोंडकारूळ गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी निकेश कांबिरे (रा. वेहेरगांव तामावळ, लोणावळा ग्रामीण), प्रतीक देशमुख (रा. वेहेरगांव तामावळ, लोणावळा ग्रामीण), यश कैलास पडवळ (रा. वेहेरगाव तामावळ, लोणावळा ग्रामीण) आणि गौस संजय पट्टाधारी (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांना अटक केली आहे. उर्वरित पाचजणांचा शोध लोणावळा पोलिस घेत आहेत.

गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारूळमधील कमलेश तानाजी धोपावकर आपल्या मित्रांसह करंजा बंदरातील बोटीवर काम करत होते. समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ३० मे पूर्वीच मच्छीमारी थांबली. त्यामुळे कमलेश ज्या बोटीवर काम करत होते त्या बोटीच्या नाखवाने बोटीवरील सर्वांना सोबत घेऊन लोणावळातील मच्छीमार समाजाचे कुलदैवत श्री एकवीरा आईच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कमलेश आणि १६ जण लोणावळा येथे भाड्याच्या वाहनाने गेले. लोणावळा येथे एका फार्महाऊसमधील खोली त्यांनी घेतली. तेथे ते देवदर्शनाला गेले. सायंकाळी फार्महाऊसवरून निघताना त्याच ठिकाणी राहायला आलेल्या चार ते पाचजणांबरोबर गाडी वळवण्यावरून वाद झाला; मात्र हा वाद फार्महाऊसच्या मालकाने मिटवला. त्यानंतर कमलेश आणि सहकारी आपले वाहन घेऊन तेथून बाहेर पडले.

अवघ्या १५ मिनिटांत एक मोटार, रिक्षा व एका दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी आपल्या गाड्या आडव्या घालून कमलेश आणि सहकारी असलेले वाहन अडवले. वाहनाची किल्ली काढून घेतली आणि कमलेश आणि सहकाऱ्यांना काठ्या व रॉडने मारहाण केली. यामध्ये कमलेशला यांच्या डोक्यावर वर्मी घाव बसला. कमलेशचा सहकारी मनोज वरवाटकरचा हात जायबंदी झाला तर प्रज्वल मेहताच्या डोक्याला मार लागला. हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. त्यांना स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कमलेशला मृत घोषित केले. कमलेशचा मृतदेह कोंडकारूळ गावात आणला. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नऊ संशयितापैकी पोलिसांनी २५ मे रोजी रात्रीच अटक केली. उर्वरित दोघांना २६ मे रोजी लग्नाच्या मांडवातून पोलिसांनी उचलले. उर्वरित पाचजणांचा शोध घेत आहेत.