Tuesday, July 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

खेडमध्ये तीन तरुणांवर गुन्हा दाखल, ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीवर खेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबके परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा तरुणांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून गांजा आणि महागड्या मोबाईल फोनसह एकूण ६७ हजार २४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी रात्री १०:४७ च्या सुमारास खेड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुंबके येथील एका खोलीवर छापा टाकण्यात आला. यावेळी अफजल जहीर कादिरी (वय २४, रा. नांदगाव मोहल्ला, खेड), सद्दाम अबु बकर दुदूके (वय २५, मूळ रा. मुंबके, सध्या रा. कल्याण) आणि अवधूत राजेश घोडे (वय २६, रा. कोष्टी आळी, खेड) हे तिघे गांजा विक्रीच्या तयारी असताना मिळून आले.

पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असता, त्यांच्याकडे अंमली पदार्थ विक्रीसाठी लागणारे साहित्य, ​मोबाईल फोन आणि वस्तू जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण ६७,२४९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुरज निवृत्ती मोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिन्ही आरोपींविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८ (क), २० (ब), २ (ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, गांजाचे नेटवर्क कोठपर्यंत पसरले आहे, याचा छडा लावला जात आहे.