रत्नागिरी:- स्वातंत्र्यदिनाच्या दुपारच्या सुमारास रत्नागिरीतील गयाळवाडी परिसरातील एका बिल्डींगच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपये किंमतीची जुनी टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते ३.४५ वाजण्याच्या दरम्यान गयाळवाडी येथील जितेंद्र साळवी यांच्या बिल्डींगची पार्किंग, ता. जि. रत्नागिरी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनमंत देवाप्पा पाटील (वय ३४ वर्षे, व्यवसाय गवंडी, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी, मूळ रा. किरहर्षी, ता. खानापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी ही फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हनमंत पाटील यांची काळी रंगाची जुनी वापरती टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल (क्र. एम.एच. ०८ ए.आर. ०९३०) ही १५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते पावणेचार वाजेच्या दरम्यान गयाळवाडी येथील जितेंद्र साळवी यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लावली होती. या दरम्यान, फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने कोणीतरी अज्ञात इसमाने ही गाडी तिथून लांबवली.
चोरीस गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत १२,००० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) तसेच जुन्या भा.द.वि. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









